पूर्णा मंडळात ढगफुटी; अडीच तासात 140 मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 05:39 PM2020-09-18T17:39:14+5:302020-09-18T17:40:54+5:30
अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना नद्यासह ब्रम्हणाळ, पिंगलगड यासारख्या लहान ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
पूर्णा : सततच्या पावसाने आधीच खरीप पीके धोक्यात असताना शुकवारी ( दि 18) पहाटे पूर्णा परिसरात ढगफुटी झाली. पावसाचा वेग व थेंबाचा आकार इतका मोठा होता की पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे येत होते. महसूल विभागानुसार पहाटेच्या दोन तासात साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी ( दि. 18 ) पहाटे पूर्णा मंडळात ढगफुटी झाली. अडीच तासाच्या काळात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने शेतीतील सखल भागात पाणी साचले आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना नद्यासह ब्रम्हणाळ, पिंगलगड यासारख्या लहान ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ग्रामीण भागातल्या ओढ्याना पाणी आल्याने पांगरा, वडगाव आहेरवाडी या भागातील शेत रस्ते काही काळासाठी बंद झाले होते.
पहाटे दीड वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अडीच तास एक सारखा पडणारा पाऊस पाहणाऱ्यांनाही भीतीदायक ठरत होता. शहरातील सखल भागात असलेल्या काही घरात पाणी शिरले होते. तर नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या. पाटबंधारे विभागाने कनिष्ठ अभियंता पी जी रणवीर यांनी दिलेल्या माहितीवरून पूर्णा नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे.
पिकांचे अतोनात नुकसान
पूर्णा तालुक्यात मागील पंधरा दिवसात कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे कापूस सोयाबीन यासह इतर पिकांना पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन पिकाच्या शेंगा झाडावर समोर येत आहेत तर कापसाची बोंडे कुजून जात आहेत हळदीची स्थितीही गंभीर असून कंदकूजण्याची स्तिथी निर्माण झाली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत तालुक्यात 714 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.