ढगाळ वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटली; हरभराही घाटेअळीच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:58 PM2020-02-12T18:58:23+5:302020-02-12T18:59:30+5:30
शेतकरी नवीन संकटात सापडला आहे़
पाथरी : परतीच्या पावसाने तालुक्यातील रबी हंगाम लांबणीवर पडल्याने या हंगामात अजूनही क्षमतेएवढा पेरा झाला नसला तरी सद्यस्थितीत गव्हाचे पीक पोटऱ्यात असून, ढगाळ वातावरणामुळे या पिकाची वाढ खुंटली आहे़ तर दुसरीकडे हरभऱ्याच्या पिकाला घाटेअळीने घेरले असून, शेतकरी नवीन संकटात सापडला आहे़
खरीप हंगामामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला़ त्यामुळे कापूस, सोयाबीन पिके हातची गेली़ हा पाऊस आॅक्टोबर महिन्यात झाल्याने रबीची पेरणीही लांबली़ पावसामुळे खराब झालेली शेत जमीन दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा बहुतांश वेळ गेला़ त्यामुळे यावर्षी तालुक्यात १६ हजार ११७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ प्रत्यक्षात रबीसाठी २४ हजार ८४९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे़ त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली असून, हे पीकही आता अडचणीत सापडले आहे़ संपूर्ण हिवाळ्यामध्ये शेकोटी पेटवावी लागेल, अशी थंडी पडली नाही़ ढगाळ वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे़
दुसरीकडे हरभऱ्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ विशेष म्हणजे अनेक भागांमध्ये अजूनही पेरणी केली जात आहे़ गव्हासाठी थंडी पोषक असते़ मात्र थंडी नसल्याने या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे़ सध्या पाथरी तालुक्यामध्ये गहू, पोटऱ्यात असून, त्या पुढे वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ महिनाभरापासून सतत ढगाळ वातावरण राहिल्याने गव्हाचा उतारा घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
प्रथमच वाढले बाजरीचे क्षेत्र
रबी हंगामामध्ये यावर्षी प्रथमच नवीन जातीच्या बाजरीची पेरणी करण्यात आली आहे़ जनावरांसाठी चारा म्हणून उपयुक्त असलेली बाजरी शेतकऱ्यांनी घेतली असून, हे पिकही बहरात आहे़ विशेष म्हणजे यावर्षी बाहेर जिल्ह्यातून बियाणे मागवून बाजरीची पेरणी करण्यात आली आहे़ त्यामुळे ज्वारी बरोबरच या भागात अनेक वर्षानंतर बाजरीचे उत्पादनही निघणार आहे़
ज्वारीचे पीक बहरले
गहू आणि हरभरा या दोन पिकांना वातावरणाचा फटका बसला असला तरी ज्वारीसाठी मात्र ढगाळ वातावरण पोषक ठरत आहे़ त्यामुळे ज्वारी बहरली आहे़ यावर्षी ज्वारीची पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली असून, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे़; परंतु, पेरणीला उशीर झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना त्याचाही फटका सहन करावा लागेल, अशी शक्यता आहे़