कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन, हेल्दी पदार्थ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:55+5:302021-06-16T04:24:55+5:30
कोरोनाला टाळण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी शरीराला आवश्यक असलेले जेवण, सकस आहार, खाद्यपदार्थ गृहिणी घरी बनवित आहेत. लहान मुुले, ...
कोरोनाला टाळण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी शरीराला आवश्यक असलेले जेवण, सकस आहार, खाद्यपदार्थ गृहिणी घरी बनवित आहेत. लहान मुुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वच वयोगटातील सदस्यांच्या तब्येती जपून त्यांचा आहार घरोघरी बनविला जात आहे. यात पालेभाज्या, फळभाज्या, फळांचे सेवन, व्हिटॅमीन सी घटक मिळणारे सरबत, फळ, कडधान्य आणि कमी तेलकट, कमी तिखट पदार्थ तयार करून महिलांनी घरातील सदस्यांचे आरोग्य जेवणाच्या माध्यमातून जपले आहे.
फास्टफूडवर अघोषित बंदी
शहरात अनेक महिने लॉकडाऊन होते. यामुळे हाॅटेल्स, फास्टफूड, चाट भांडार, खानावळ, नाष्टा सेंटर, पावभाजी, चायनीज, पाणीपुरी व अन्य पदार्थांची हाॅटेल्स, दुकाने मध्यंतरी बंदच होती. यामुळे या पदार्थांची रेसिपी शिकून महिलांनी घरातील सदस्यांसाठी असे पदार्थ बनविले. यामुळे नेहमी फास्टफूड खाणाऱ्या अनेक सदस्यांचे बाहेर खाण्याचे प्रमाण कमी झाले. यातच घरातील महिलांनी हे पदार्थ स्वच्छता आणि अन्य कारणांमुळे विकत आणण्यास बंदी घातल्याने सध्या तरी फास्टफूडवर काही जणांची अघोषित बंदी आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच
सध्या प्रत्येक घरी दूध, तूप, पनीर, पेंडखजूर, राजगिरा, लिंबू-पाणी हे पदार्थ जेवणाशिवाय वेगळे खाण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच कडधान्य, मोड आलेले धान्य यांचे सेवन करावे. फळ, पालेभाज्या यांचे प्रमाण जेवणात वाढविणे गरजेचे आहे.
- डॉ. सारिका नरेंद्र ब्रम्हपूरकर, आहारतज्ज्ञ.
कच्च्या भाज्या, कडधान्ये खा
मटकी, उडीद आणि कडधान्ये यांना शिजवून खाण्यापेक्षा ते कच्च्या स्वरुपात खावेत. त्यांना शिजवून खाऊ नये. तसेच भाजी जास्त प्रमाणात शिजवू नये. जेवणात गोड, तिखट, आंबट, खारट हे सर्व पदार्थ असावेत. पावसाळा सुरू झाल्याने पालेभाज्यांचे सेवन कमी करून त्याऐवजी फळभाज्या जास्त प्रमाणात खाव्यात, असा सल्ला आहारतज्ञ कोरोना कालावधीत देत आहेत.
गृहिणी म्हणतात
घरातील सर्व सदस्यांच्या आहाराच्या वेळा आणि त्यात समाविष्ट असणारे पदार्थ यांचे तंतोतंत पालन केले जात आहे. अति तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ बनविणे टाळत आहेत. तसेच कोरोनामुळे बाहेरील पदार्थ आणणे आणि खाणे टाळले आहे.
- दीपाली जोशी.
जेवण, नाष्टा आणि अन्य खाद्यपदार्थ तयार करताना प्रत्येकाच्या तब्येतीचा विचार केला जात आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलेल्या संतुलित आहारावर भर दिला जात आहे. जेवण तयार करताना तेलाचा वापर कमी करत आहे. - संतोषी खंगले.
जेवणात हिंग, मिरे, दालचिनी आणि अन्य आयुर्वेदिक औषधींच्या मात्रा वापरल्या जात आहेत. तसेच वजन वाढविणारे पदार्थ बनविणे टाळत आहे. घरातच अधूनमधून लहान मुलांसाठी शेवयाची खीर, पापड्या, खारोड्या, कुरुड्या, सातूचे पीठ असे पदार्थ उन्हाळ्यात बनविले आहेत. - राजश्री जोशी.