कोरोनाने हिरावले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:07+5:302021-06-11T04:13:07+5:30
परभणी : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १०९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, त्यात ७६० पुरुषांचा समावेश आहे. ...
परभणी : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १०९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, त्यात ७६० पुरुषांचा समावेश आहे. यात शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू हिरावले गेले आहे. यासंदर्भात महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १३४ महिला निराधार झाल्या असून त्यांना शासन मदत देण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूचे सत्र सुरू झाले होते. या काळात महिलांबरोबरच पुरुषांचेही मृत्यू झाले आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचा आकडा मोठा असला तरी प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात १ हजार ४९ जणांची माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये अनेक महिलांचे कुंकू हिरावले गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र याच काळात १३४ महिलांना कोरोनाने निराधार केले आहे. या महिलांचे पाल्य १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याने त्यांना शासकीय मदत देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करीत आहे. शासनाच्या कोणत्या योजनेतून या निराधार महिलांना मदत दिली जाऊ शकते, या संदर्भातील प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्ग काळात अनेक महिलांचे कुंकू हिरावले असून, त्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे.
कोरोनाने १३४ महिलांना केले निराधार
कोरोनाच्या संसर्गामुळे पतीचे निधन झाल्याने जिल्ह्यातील १३४ महिला निराधार झाल्या आहेत. या महिलांचे पाल्य १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या महिलांना आर्थिक दृष्ट्या अडचणी निर्माण होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन येथील महिला व बालकल्याण विभाग यांच्या वतीने अशा महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. या महिलांना शासनाच्या कोणत्या योजनांमधून मदत दिली जाऊ शकते, यासंदर्भात विचारविनिमय केला जात आहे. सध्या तरी यासंदर्भात निर्णय झाला नसला तरी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना समोर हे प्रस्ताव ठेवून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
निराधार योजनेतून मदतीची आशा
कोरोनाने निराधार झालेल्या या महिलांना शासनाच्या निराधारांच्या संदर्भात असलेल्या योजनांमधून मदत मिळू शकते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, कुटुंब निवृत्तीवेतन योजना यासारख्या काही योजना निराधारांसाठी आहेत. त्या योजनेतून महिलांना मदत दिली जाऊ शकते का? याविषयी सध्या अधिकाऱ्यांकडून विचार विनिमय केला जात आहे.
कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १३४ महिला निराधार झाल्याचे प्राथमिक स्तरावर स्पष्ट होत आहे. या महिलांची यादी तयार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव टास्क फोर्सच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यात संजय गांधी निराधार योजना व यासारख्या इतर योजनेतून या महिलांना मदत दिली जाऊ शकते का याविषयीचा प्रस्ताव चर्चेला घेतला जाईल. त्यानंतरच निर्णय होईल.
गोविंद अंधारे, महिला बालविकास अधिकारी