CoronaVirus : धक्कादायक ! चार दिवसांपासून पाथरीत अडकलेल्या चंद्रपूरच्या ७० मजुरांची अद्याप आरोग्य तपासणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:50 PM2020-03-30T16:50:35+5:302020-03-30T16:53:01+5:30
फलटण येथील काखान्याला होते कामाला
पाथरी : तालुक्यातील लोणी बु येथील ऊस तोडणी मुकादमाने चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील 70 ऊसतोड मजूर फलटण येथील साखर कारखान्याला कामाला नेले होते कारखाने बंद झाल्यानंतर फलटण येथून हे सर्व मजूर चार दिवसापूर्वी 26 मार्च रोजी पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील तांड्यावर येऊन दाखल झाले आहेत मात्र पुढे जाण्यासाठी आता रस्ते बंद असल्याने ते सर्व लोणी येथे अडकून पडले आहेत. या बाबत तहसीलदार यांच्याकडे लेखी माहिती देण्यात आली नव्हती असे कळत असून त्यांची आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे.
पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील शामराव पवार हे ऊस तोडणी मुकादम आहेत , कर्नाटक राज्यातील एका कारखाण्यासोबत त्यांनी या वर्षी करार केला होता , चार टोळ्यातुन जवळपास 100 मजूर ऊसतोडणी साठी नेण्यात आले होते त्यातील 70 मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील आहेत. कर्नाटकच्या कारखान्याचे गाळप बंद झाल्यानंतर हे मजूर दोन महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कापशी शरयू ऍग्रो इंडस्ट्री या साखर कारखान्यावर कामाला होते.
24 मार्च रोजी सर्व मजूर फलटण येथून ट्रॅक्टर ने थेट परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील तांड्यावर म्हणजेच मुकडमाच्या गावी आले आहेत , गेल्या चार दिवसा पासून हे मजूर लोणी तांड्यावर आहेत आज त्यांच्याकडे असलेले सर्व रेशन संपले आहे ,त्याना पुढे जाता येईना आणि थांबता येईना अशी अवस्था झाली आहे. या मुळे मजूर चांगलेच अडचणीत सापडले आहेत , मजुरांची वैधकीय तपासणी झाली की नाही या बाबत प्रशासन नाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती , विशेष म्हणजे आलेले मजूर गावात चक्क कापूस वेचून मजुरी करत आहेत.
स्थलांतर परवानगी देता येणार नाही
पाथरी तालुक्यातील लोणी बु येथे काही ऊस तोड मजूर आले असल्याची माहिती मोबाईल वर मिळाली आहे. मात्र संचारबंदी मुळे जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत त्या मुळे कोणालाही स्थलांतर परवानगी देता येणार नाही. अडकलेल्या मजुरांची मुकादमाने सोय करावी
-एन यु कागणे, तहसीलदार,पाथरी