पालम : तालुक्यातील पारवा येथे स्वस्तधान्य दुकानाचे धान्य मिळवून देऊ असे सांगण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारेजमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली़ या प्रकरणी ५ मुख्य आरोपींसह १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पालम तालुक्यातील पारवा येथे पुरवठा विभागाकडून स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात येत होते़ गावामध्ये पुणे येथून आलेल्या स्थलांतरित कुटूंबाचे नाव यादीत नसल्याने सदरील रेशन दुकानदाराने त्यांना धान्य देण्यास नकार दिला़ तसेच याबाबत तहसील कार्यालयास कळविले जाईल, असे सांगण्यात आले; परंतु, २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता काही जणांनी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारास गावात बोलावून घेऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत ग्रामस्थांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली़ तसेच एकाने गावातील मंदिरासमोर ग्रामस्थांनी यावे थोड्याच वेळात जिल्हाधिकारी गावात येणार आहेत, अशी खोटी माहिती ध्वनीक्षेपकाद्वारे ग्रामस्थांना दिली़ त्यामुळे मंदिरासमोर १०० ते १२५ जणांचा जमाव जमला़
ही माहिती तहसील कार्यालयास मिळाल्यानंतर नायब तहसीलदार प्रकाश गायकवाड, मंडळ अधिकारी के़पी़ शिंदे हे गावात आले असता, त्यांना हा जमाव दिसून आला़ त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास मंडळ अधिकारी शिंदे यांच्या फिर्यादीवरुन डिगंबर मुंजाजी कºहाळे, मंचक त्र्यंबक कºहाळे, उस्मान हुसेन मोमीन, शेख रहीम व एका पत्रकारासह जवळपास १०० ते १२५ जणांवर पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत़