सेलू:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. उपलब्ध डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या हिंमतीने दिवसराञ काम करून कोरोनाचा मुकाबला तुटपुंज्या मनुष्यबळ असतानाही करत आहेत.
देशात लॉकडाऊन केलेल्या नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक आदी महानगर आणि विविध राज्यात मुजरी करणारे हजारो स्थलांतरीत ग्रामस्थांचे लोंढे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंञणेवर मोठा ताण आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैघकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आरोग्य सहाय्यक बाहेर गावाहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम करत आहेत.
सेलू तालुक्यात वालूर आणि देऊळगाव हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. वालूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १४ उपकेंद्र आणि ५२ गावे आहेत तर देऊळगाव अंतर्गत १२ उपकेंद्र असून ४२गावांचा समावेश आहे. एकूण ९४ गावात विविध शहरातून दाखल झालेल्या ग्रामस्थांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. संशयित आढल्यास संबंधित व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. सद्यस्थितीत १५ आरोग्य सेवक, २३ आरोग्य सेविका, ९ कंञाटी कर्मचारी २ आरोग्य सहाय्यक ५ वैघकीय अधिकारी तपासणीच्या कामात आहेत. तसेच प्रत्येक गावातील बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांची वारंवार माहिती घेत आहेत. दरम्यान, कोरोनाना मुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत.
त्या दोघांचा अहवाल निगेटिव्ह पुणे येथून परतलेल्या चिकलठाणा बु आणि हातनूर येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा स्वॅब आरोग्य विभागाने घेतला होता. या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील ९४गावात आजपर्यंत ३हजार ४२८ स्थलांतरित ग्रामस्थ परतले आहेत. दररोज बाहेर गावाहून लोक परतत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, आणि ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभत आहे. उपलब्ध आरोग्य विभागातील कर्मचारी सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. केवळ बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रावजी सोनवणे यांनी केले.
१४ गावांना आशाताईची नियुक्ती नाही गाव पातळीवर आरोग्यच्या दृष्टीने काम करणा-या आशाताईची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना त्यांच्या कामावर मोबदला दिला जातो. गावातील महिला आणि वृध्दाच्या आरोग्याची काळजी घेत असतात. तसेच आरोग्य विभागाला त्यांची चांगली मदत होते. माञ सेलू तालुक्यातील खादगाव, सोनवटी, तळतुंबा, वाघ पिंप्री, लाडनांद्रा, पिंप्रुळा,मापा, पार्डी, आडसर, नांदगाव, कुंभारी, बोरगाव जहागिर, शिंगठाळा या १४ गावात आशाताईची नियुक्ती झालेली नाही. शासनाकडे या संदर्भातील प्रस्ताव पडून आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ज्या गावात आशाताई नाहीत. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाची मदत आरोग्य विभागला घ्यावी लागत आहे.