गंगाखेड: बाहेर गावावरून तालुक्यात आलेले एक दांपत्य व दोन तरुणांना ताप, सर्दी, खोकला व घशाचा त्रास होत असल्याने दि. ३० मार्च सोमवार रोजी या चौघांना ही उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. तालुक्यात सापडलेल्या एकूण बारा संशयीतांपैकी एकास स्वाईन फ्लू झाल्याचा तर अन्य सात जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
विदेशासह मुंबई, पुणे व परराज्यातून शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने परत आलेल्या नागरिकांपैकी एक दांपत्य व दोन तरुण अशा चौघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मल्लूरवार, परिचारिका एस.बी. लाड, के. यु. चौधरी, वर्षा मुंडे, अनुराधा वाघमारे यांनी या चौघांचा स्वॅब नमुना घेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल करून घेतले आहे.
दरम्यान, यापूर्वी एकूण बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले होते. यातील बाहेर गावावरून आलेले सहा नागरिक व डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर मुंबई येथून आलेल्या सोनपेठ तालुक्यातील एका तरुणास स्वाईन फ्लू झाल्याचा रिपोर्ट यापूर्वीच प्राप्त झाला आहे. उर्वरित चौघांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी दिल्या आहेत. डॉ. वसीम खान, डॉ. केशव मुंडे, डॉ. इरफान खान, डॉ. योगेश मल्लूरवार, आरोग्य कर्मचारी शेख शफी, चव्हाण, शेख खाजा आदी कर्मचारी बाहेर गावावरून रुग्णालयात येणाऱ्या संशयीत रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य त्या सूचना देत आहेत.