जिंतूर : परभणी जिल्ह्यात कोरोनाने पुनर्प्रवेश केला असून मुंबईहून परतलेल्या एकाचा कुटुंबातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे कुटुंब जिंतूर तालुक्यातील शेवडी या मूळगावी परतले असून या कुटुंबातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे जिंतूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसेच शेवडी हे संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये गार्ड म्हणून कार्यरत एक पोलीस कर्मचारी जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचे रहिवासी आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ते कुटुंबाला घेऊन गावाकडे आले. जिंतूरला आल्यानंतर त्यांनी स्वतःसह पत्नी आणि दोन मुलांची कोरोना तपासणी करून घेतली होती. तपासणी अहवाल येईपर्यंत या कुटुंबाला डॉक्टरांनी क्वारंटाईन केले होते.
गुरुवार १४ मे रोजी रात्री त्यांचे अहवाल प्राप्त झाले. यात पोलीस कर्मचारी यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतू त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. तर अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर शेवडी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडून घोषित करण्यात आले आहे. गावाच्या सर्व सीमा रात्रीत सील करण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णांचे नातेवाईक व मागील प्रवासाचा इतिहास याची प्रशासनाकडून ताबडतोब माहिती संकलित करण्यात आली असून याबाबत पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.