परभणी जिल्ह्यातून कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग जातो. यासह औरंगाबाद-नांदेड हाही प्रमुख मार्ग आहे. यासह सात ते आठ राज्यमार्ग जिल्ह्यातून जातात. या सर्व मार्गांवर जड वाहनांसह अन्य वाहनांची २४ तास वर्दळ असते. यातील काही महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे तर काहींचे काम प्रगतिपथावर आहे. परभणी-नांदेड या महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या सर्वच महामार्गांवर काही ठराविक ठिकाणे अशी आहेत, जेथे किरकोळ अपघात तसेच मोठे अपघात नेहमीच घडतात. कोरोनाच्या पूर्वी आणि कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले होते. मागील काही दिवसांत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी होणारे अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू काही कमी झालेले नाहीत. यामुळे वाहनधारकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
वर्ष अपघात जखमी मृत्यू
२०१८ ४२ ४७ २५
२०१९ ३८ ३६ १९
२०२० ३१ १२ २५
२०२१ मे पर्यंत १४ ०५ ११
लाॅकडाऊनमध्ये अपघात सुरूच
मागील वर्षी २०२० व सध्या २०२१ मेपर्यंत ४५ अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये हे अपघात झाले आहेत.
पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू
जिंतूर ते देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावर मागील वर्षभरात रस्त्याने पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जड वाहनांसह किरकोळ छोट्या वाहनांच्या अपघातात रस्त्याने पायी जाणाऱ्या ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे पायी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.
मृतांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक
राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गावर झालेल्या कोरोना काळातील आणि त्यापूर्वीच्या अपघातांमध्ये मृत्यू झालेले नागरिक सर्वच वयोगटातील असल्याचे दिसून येते. यात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.
या ठिकाणी वाहने हळू चालवा
देवगाव फाट्याजवळील करपरा नदी पूल, चारठाणा वळण रस्ता, नागठाणा पाटी, ताडबोरगाव, परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा, आरळ, तेलगाव, परभणी-जिंतूर रस्ता, देवगाव फाटा-पाथरी रस्ता, जिंतूर - सेनगाव रस्ता या ठिकाणी वाहनधारकांनी काळजी घेत वाहने चालविणे गरजेचे आहे.
महामार्ग विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषण उपाध्याय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ३ प्रमुख महामार्गांवर १५० मृत्युंजय दूत नेमण्यात आले आहेत. हे दूत एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याची माहिती त्वरित महामार्ग पोलिसांना देतात. यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होत आहे. वाहन चालकाने वाहनावर नियंत्रण राहील, अशा पद्धतीने वाहने चालवावीत. यामुळे अपघात होणार नाहीत.
- त्र्यंबक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस पथक, जिंतूर.