'संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'; परभणीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 01:58 PM2020-11-04T13:58:00+5:302020-11-04T14:11:12+5:30
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
परभणी : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. संपूर्ण जिल्हाभरात ही परिस्थिती असताना प्रशासनाने मात्र काही मंडळांना मदतीपासून वगळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सकसकट मद्त द्यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी जिल्ह्यात चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
परभणी- गंगाखेड रस्त्यावर पोखर्णी फाटा येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यात शेतकरी आर्थिक दृष्टीने खचला असताना शासन, प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही. याविरुद्ध पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणी तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माजी सभापतीे गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, मधुकरराव लाड, तुकाराम गिराम, राजाराम कच्छवे, भास्कर कच्छवे, मारोतराव गमे, अंगद घाटगे, श्रीकृष्ण घाटगे, रवि कांबळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे गंगाखेड रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. दोन तास आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.