वैद्यकीय महाविद्यालयाचा ठराव घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:36+5:302021-01-10T04:13:36+5:30
परभणी : जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात असून, महानगरपालिकेच्या सभागृहातही या संदर्भातील ठराव घ्यावा, ...
परभणी : जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात असून, महानगरपालिकेच्या सभागृहातही या संदर्भातील ठराव घ्यावा, अशी मागणी नगरसेवक सचिन देशमुख यांनी उपमहापौरांकडे केली आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. हे महाविद्यालय परभणीत सुरू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा शैक्षणिक अनुशेषही भरून निघणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत आवश्यकता आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यात राहून वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीदेखील होणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी महानगरपालिकेची भूमिका महत्तवपूर्ण ठरते. तेव्हा मनपाच्या सर्वसाधारण सभेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ठराव मंजूर करून तो केंद्र व राज्य शासनाला पाठवावा, अशी मागणी सचिन देशमुख यांनी केली आहे.