ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये कोणत्याही व्यापाऱ्याने अनुसरलेल्या कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेमुळे झालेला त्याचा तोटा वा नुकसान याबाबत तक्रार करता येते. केंद्र, राज्य शासनाने क्षेत्र प्रशासनाने एका ग्राहकास अधिक ग्राहकांच्या वतीने एकाच कारणासाठी तक्रार करता येते. तक्रारकर्ता ग्राहक स्वतः किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधीही तक्रार दाखल करू शकतो. या अनुषंगाने ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाखल होतात. गतवर्षी कोरोनामुळे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ग्राहकांनी लॉकडाऊनमुळे ग्राहकांनी घरातच बसणे पसंद केले. नंतर मात्र तक्रारी नियमितपणे दाखल होत आहेत. आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानेे अनेक ग्राहकांना ग्राहक तक्रार निवारण मंचच्या वतीने न्याय देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष अनुराधा सातपुते व सदस्या किरण मंडोत यांनी दिली.
तक्रारी नेमक्या काय?
पीक विमा भरूनही संबंधित कंपनीकडून मदत देण्यात आली नाही, शेतकरी अपघात विमा योजनेत पात्र असूनही विम्याची रक्कम मिळाली नाही, एखादे उत्पादन खरेदी केल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचे निघाले, एक वस्तू ऑनलाईनच्या माध्यमातून मागविली दुसरीच वस्तू आली, अशा प्रकारच्या विविध तक्रारी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे येत आहेत. शिवाय बॅंकेच्या एटीएममधून पैसे आले नाहीत. रेल्वेत लूट झाली, भरपाई मिळाली नाही, अशाही तक्रारी मंचकडे येत आहेत.
फसवणुकीच्या तक्रारीही दाखल
सध्या ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकारही समोर येत आहेत. याविरोधात दाद मागण्यासाठी नागरिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घेत आहेत. त्यांना न्याय देण्याचे काम या मंचच्या माध्यमातून सुरू आहे.
एखादे उत्पादन किंवा वस्तू निकृष्ट दर्जाची आल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचकडे तक्रार करावी, त्यांना पडताळणीअंती नक्कीच न्याय दिला जाईल. शेतकरी पीक विमा, शेतकरी अपघात विमा, बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले, या अनुषंगानेही ग्राहक तक्रार निवारण मंचकडे तक्रार करता येते. ग्राहकांनी जागरूक राहून त्यांचा हक्क नि:संकोचपणे बजावला पाहिजे.
- अनुराधा सातपुते, अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण मंच, परभणी
२०२० मध्ये दाखल तक्रारी
जानेवारी ८७
फेब्रुवारी १६८
मार्च ११०
एप्रिल ००
मे ००
जून ०५
जुलै २९
ऑगस्ट ५३
सप्टेंबर ५०
ऑक्टोबर ८३
नोव्हेंबर १०१
डिसेंबर १३२