मनपाच्या उदासीनतेमुळे निधी मिळूनही रखडले सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:56+5:302021-07-20T04:13:56+5:30
परभणी शहरातील बसस्थानक परिसरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी ...
परभणी शहरातील बसस्थानक परिसरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी महानगरपालिकेला १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रस्ताविक कामांची जागा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असल्याने महामार्ग विभागाने हे काम रोखले आहे. परंतु, ही जागा महामार्गाच्या हद्दीत येत नाही. महामार्गाच्या हद्दीच्या बाहेर आणि मनपा हद्दीत ही जागा आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने महामार्ग प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून या जागेच्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे; मात्र हे प्रमाणपत्र घेण्यास मनपा प्रशासनाने टाळाटाळ केली. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही या वर्षभरात पुतळा सुशोभिकरणाचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन दखल घेईल का? असा सवाल केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा
पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या संदर्भाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला होता. तेव्हा जर ही जागा महामार्गाच्या हद्दीबाहेर असेल, तर नाहरकत दिले जाईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. त्यामुळे मनपातून पत्रव्यवहार होण्याची गरज आहे.