परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दुष्काळी झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:06 AM2018-10-15T00:06:44+5:302018-10-15T00:07:17+5:30
परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यानंतर राज्यामध्ये दुष्काळाची ओरड वाढत चालली असून, प्रशासनानेही या संदर्भात चाचपणी करून दुष्काळाची कळ सोसणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांची यादी जाहीर केली आहे़ त्यात परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश असल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे मानले जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यानंतर राज्यामध्ये दुष्काळाची ओरड वाढत चालली असून, प्रशासनानेही या संदर्भात चाचपणी करून दुष्काळाची कळ सोसणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांची यादी जाहीर केली आहे़ त्यात परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश असल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे मानले जात आहे़
जिल्ह्यात यावर्षी पावसाने ताण दिला़ सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस बरसल्याने शेतकºयांच्या चेहºयावर हसू फुलले होते़ अनेक वर्षानंतर प्रथमच जिल्ह्यात जून महिन्यामध्येच खरिपाच्या पेरण्याही झाल्या़ मात्र त्यानंतर पावसाने रंग दाखविण्यास सुरुवात केली़ कधी खंड पाऊस तर कधी दीर्घ खंड दिल्याने खरिपाची पिके कशीबशी काढावी लागली़ आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गायब झालेला पाऊस आजपर्यंत परतला नाही़ त्यामुळे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे़ खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना पाऊस झाला नसल्याने खरिपाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे़ मूग, उडीद आणि बहुतांश ठिकाणी सोयाबीन निघाले आहे़ त्यामुळे या पिकांचे उत्पन्न कमी झाले असले तरी शेतकºयांना थोड्याफार प्रमाणात पीक हाती लागले़ मात्र कापूस फुटण्याच्या अवस्थेत असून, याच वेळी पावसाने ताण दिल्यामुळे कापसाचे पीक धोक्यात आहे़ अनेक भागांमध्ये पहिली वेचणीही झालेली नाही़ त्यामुळे पाण्याचा ताण या पिकाला सहन करावा लागेल़ रबी पेरण्या खोळंबल्या आहेत़ पाऊस नसल्याने जिल्ह्यात कुठेही पेरण्या झाल्या नाहीत़ पाण्याची अवस्थाही अशीच बिकट झाली आहे़ त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरीत असून, जिल्हा प्रशासनही या संदर्भाने माहिती जमा करण्याच्या कामात गुंतले आहे़
दरम्यान, यावर्षीच्या पावसाळी हंगामात झालेल्या पावसाच्या टक्केवारीवरून दुष्काळाची झळ असणाºया तालुक्यांची व जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झाली आहे़ त्यात परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे़ परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४़६२ मिमी एवढी आहे़ प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत ५९़०९ टक्के पाऊस झाला आहे़ परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ८८ टक्के पावसाची नोंद झाली़ त्यामुळे शासनाच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून पूर्णा तालुका वगळला गेला आहे़ इतर तालुक्यांची नावे मात्र दुष्काळाची पहिली कळ बसलेल्या तालुक्यांच्या यादीत आली आहे़ त्यामुळे आता या तालुक्यांमध्ये शासनाने प्रत्यक्ष मदतीची कामे सुरू करणे अपेक्षित आहे़
जिल्ह्यातील प्रकल्प कोरडेठाक
परतीचा पाऊस झाला नसल्याने पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ परभणी जिल्ह्यातील एकही प्रकल्प १०० टक्के भरलेला नाही़ त्यामुळे आगामी नऊ महिने जिल्हावासियांना जमा झालेल्या जेमतेम पाण्यावर तहान भागवावी लागणार आहे़ जिल्ह्यात सद्यस्थितीला येलदरी प्रकल्पात ९़०३ टक्के पाणीसाठा जमा आहे़ निम्न दूधना प्रकल्पात २४़०१ टक्के पाणीसाठा असून, करपरा मध्यम प्रकल्पात ७५़०७ टक्के, मासोळी मध्यम प्रकल्पात ९़०५ टक्के, ढालेगाव बंधाºयात ९६ टक्के, मुदगल बंधाºयात ७५ टक्के आणि डिग्रसच्या बंधाºयात ६५़५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ बंधाºयातील पाणी परिसरातील गावांना पिण्यासाठी वापरता येऊ शकते़ मात्र येलदरी आणि निम्न दूधना प्रकल्पावर मोठ्या शहरांचा पाणीसाठा अवलंबून असताना या प्रकल्पात पाणीसाठा झाला नसल्याने चिंता वाढल्या आहेत़
रबीच्या पेरण्या रखडल्या
परतीच्या पावसावर जिल्ह्यामध्ये रबी पिके घेतली जातात़ मात्र दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत़ परतीचा पाऊस न बरसताच परतल्याचे आता मानले जात आहे़ त्यामुळे या पावसाचा भरोसा राहिला नाही़ परिणामी रबीच्या पेरण्या यावर्षी होतात की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकºयांना संपूर्ण हंगामावरच पाणी सोडावे लागणार आहे़
तालुकानिहाय पावसाची टक्केवारी
जिल्ह्यात ७७४़६२ मिमी सरासरी पाऊस पावसाळी हंगामात होतो़ मात्र यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्याने सरासरी देखील पूर्ण केली नाही़ परभणी तालुक्याची वार्षिक सरासरी ८६२़६० मिमी असून, सरासरीच्या तुलनेत ५७़०४ टक्के पाऊस झाला आहे़ पालम तालुक्यात ५४़०९ टक्के, पूर्णा तालुक्यात ८८ टक्के, गंगाखेड ५७़०१ टक्के, सोनपेठ ५८़०८, सेलू ५५़०९, पाथरी ५२़०१, जिंतूर ५८ आणि मानवत तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६० टक्के पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने दुष्काहाची कळ सोसणाºया तालुक्यांच्या यादीतून पूर्णा तालुका वगळण्यात आला आहे़