गंगाखेड: घरगुती वादातून बहिणीकडे न जाता गोदावरीनदी पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिलेला स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुणाने वाचवल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान गंगाखेड-परभणी रस्त्यावर दुस्सलगाव येथे घडली. प्रसंगावधान राखत पुलावरून खाली नदी पात्रात उडी घेत तरूणाने वेळीच वृद्धेला पाण्याबाहेर काढल्याने त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर या वयात वृद्धेस आत्महत्या करण्यासारखी कोणती व्यथा असावी याचा विचार करून उपस्थित सुन्न झाले होते. लिलावती भानुदास कच्छवे असे वृद्धेचे नाव असून राजू चंद्रकांत सदाफुले ( रा. ताडकळस ता. पूर्णा ह. मु. दुस्सलगाव ता. गंगाखेड ) असे या धाडसी तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील दैठणा येथे राहणारी एक ७० वर्षीय वृद्धा लिलावती भानुदास कच्छवे घरगुती वाद झाल्याने व्यथित होती. यामुळे मुलाने गंगाखेड तालुक्यातील माकणी येथील मावशीकडे वृद्धेला एका रिक्षात बसवून रवाना केले. दरम्यान, वृद्धा माकणी येथे न उतरता अलीकडेच गंगाखेड-परभणी रस्त्यावरील दुस्सलगाव येथे उतरली. येथे थोड्यावेळ रेंगाळल्यानंतर वृद्धा खळी पाटी येथील पुलावर आली. दुपारी २:३० वाजेच्या सुमारास तिने पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी मारली. काहीजणांनी ही घटना पाहिली मात्र पात्रात जाण्याची कोणी हिंमत करत नव्हते.
बघ्यांच्या गर्दीने बुडत असलेल्या वृद्धेस पाण्याबाहेर काढण्या ऐवजी पुलावर उभे राहून मोबाईलमध्ये व्हिडीओ करणे पसंत केले. याच वेळी राजू चंद्रकांत सदाफुले ( रा. ताडकळस ता. पूर्णा ह. मु. दुस्सलगाव ता. गंगाखेड ) हा येथून दुचाकीवरून जात होता. वृद्धा पाण्यात बुडत असल्याचे पाहून क्षणाचा ही विलंब न करता दुचाकी रस्त्यावर टाकून राजूने पुलाच्या खांबाला असलेल्या पाईपचा आधार घेत पाण्यात उडी घेतली. यानंतर खळी येथील पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे, परमेश्वर कचरे, कल्याण लाडे, अर्जुन कचरे यांच्या मदतीने वृद्धेला पाण्याबाहेर काढण्यात आले. १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिका चालक बालाजी चाटे, परमेश्वर सुरवसे, पोलीस जमादार रतन सावंत व पो. ना. दत्तराव पडोळे यांनी लिलावती कच्छवे यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे, परिचारिका वैशाली केंद्रे, माया लाटे, पूनम घोबाळे, गोविंद वडजे आदींनी वृद्ध महिलेवर उपचार केले.
मला का वाचवले ?एकीकडे तरुणाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक सुरु होते तर दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर वृद्ध महिला थोडी शुद्धीवर येताच तिने मला का वाचवले असा टाहो फोडला. बहिणीकडे न जाता रस्त्यात मध्येच उतरून या वयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या वृद्धेची काय व्यथा असावी याचा विचार करत उपस्थित सुन्न झाले होते.