परभणी लोकसभेची निवडणूक:वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:49 AM2019-05-25T00:49:13+5:302019-05-25T00:49:45+5:30
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.
लोकसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा राज्यस्तरावरील सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न चांगलाचा प्रभावी ठरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बाबत झालेली चर्चा मतमोजणीनंतर खरीच असल्याचे अधोरेखीत झाले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राजकारणात नवखे असलेले हैदराबाद येथील आलमगीर मोहम्मद खान यांनी निवडणूक लढविली. त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा व पाथरी येथे जाहीर सभा घेतल्या. शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात बरीच मेहनत घेतली.
प्रचारसभा, रॅली, बैठका आदींच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना साकडे घातले. परिणामी लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात आलमगीर खान यांना बºयापैकी मते मिळाली आहेत. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ७९, परभणी विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ३३५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ३२ हजार ८०६, पाथरी विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ८२९, परतूर विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ७०० आणि घनसावंगी मतदारसंघातून २१ हजार ८५ अशी एकूण १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली.
विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा ४२ हजार १९९ मतांनी पराभव केला. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना विजयी मतापेक्षा जवळपास तीनपट जास्तीची मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचे स्वप्न वंचित बहुजन आघाडीमुळे पूर्ण होऊ शकले नाही.
विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादीच्याच पारंपारिक व्होटबँकेला सुरुंग लावला. त्यामुळे शिवसेनेचा निवडणुकीतील विजय सुकर झाल्याचे पहावयास मिळाले.
राजकीय जाणकारांना ‘वंचित’ फॅक्टर कारणीभूत वाटेना
४एकीकडे वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीमधीलच काही नेत्यांना वंचित आघाडी पराभवासाठी कारणीभूत वाटत नाही. वंचित बहुजन आघाडी पारंपारिक मते घेणार, याची पूर्व कल्पना होती.
४ मग वंचितकडे जाणारी तसेच शिवसेनेकडीच मते राष्ट्रवादीकडे का खेचली गेली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिग्गज नेते व काही कार्यकर्त्यांचे अपयश लपविण्यासाठी वंचितला दोष देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.