गंगाखेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यातील रस्ता दुरुस्तीची अनेक कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे काही कामांची मुदत संपली असतानाही ती पूर्णत्वाकडे गेली नसल्याने वाहनधारकांचा त्रास कायम आहे.
गंगाखेड-परभणी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या भांबरवाडी व दुस्सलगाव या दोन्ही गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर झाला आहे. भांबरवाडी या गावाला एक कोटी ३८ लाख ११ हजार रुपये, तर दुस्सलगाव या गावासाठी ९८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ३ ऑगस्ट २०१९ रोजी या दोन्ही रस्त्यांंचे काम सुरू करण्यात आले. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी २ मे २०२० रोजीपर्यंत मुदत दिली होती. मुदत संपून आठ महिन्यांचा कालावधी उलटला, तरी या दोन्ही रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरू करून मातीकाम करत त्यावर काही प्रमाणात खडी व मुरूम अंथरून रस्त्याची दबई केली आहे. याच परिस्थितीत काम सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे भांबरवाडी व दुस्सलगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे आणि मातीचा धुराळा झाला आहे. पावसाळ्यात मोठा चिखल होणार असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. तेव्हा, या दोन्ही रस्त्यांची सुधारणा केव्हा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.