- मारोती जुंबडे
परभणी : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक विहीर खोदण्याच्या कामासाठी जेसीबी मशीनचा वापर करुन त्यानंतर मजुरांच्या नावाने देयके सादर केल्याची चर्चा असून, याबाबत प्रशासकीय यंत्रणा मात्र चुप्पी साधून आहे.
ग्रामीण भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत सार्वजनिक विहीर खोदकाम करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले होते. या अंतर्गत ग्रामपंचायतींची निवड करुन विहिरींना मंजुरीही देण्यात आली. ही सर्व कामे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे विहिरीचे खोदकाम मजुरांच्या साह्याने करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनानेच त्यास फाटा देऊन जेसीबी यंत्राच्या साह्याने विहीर खोदकाम केले. इथपर्यंत ठीक होते, मात्र कामे जेसीबीच्या साह्याने केल्यानंतर झालेल्या कामांच्या ठिकाणी मजुरांची नावे दाखविण्यात आली. जास्तीत जास्त मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने रोजगार हमी योजना राबविली जाते. मात्र वेळेत उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या घाईपोटी मजुरांचे जॉब कार्ड जोडले खरे मात्र कामे जेसीबीच्या साह्याने करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यामुळे मजुरांना मात्र काम उपलब्ध झाले नसल्याने योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
३३३ कामांवर ५ कोटी रुपयांचा खर्चसार्वजनिक विहीर खोदकाम करताना प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट निश्चित करुन दिले होते. त्यापैकी अनेक तालुक्यांनी कामे हाती घेतली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३३३ गावांत सार्वजनिक विहीर खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहेत. त्यावर साधारणत: ५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यात गंगाखेड तालुक्यात २७ विहिरींच्या कामावर ४४ लाख ४७ हजार, जिंतूर तालुक्यात ७८ कामांवर १ कोटी १३ लाख ९७ हजार, मानवत तालुक्यात २९ विहिरींच्या कामावर ५८ लाख २२ हजार, पालम तालुक्यात २७ विहिरींच्या कामावर ३० लाख २४ हजार, परभणी तालुक्यातील ४७ विहिरींच्या कामावर १ कोटी ४ लाख ४ हजार, पाथरी तालुक्यातील २१ विहिरींच्या कामावर १७ लाख १९ हजार, पूर्णा तालुक्यातील ५४ कामांवर ६१ लाख ३६ हजार, सेलू तालुक्यातील २६ विहिरींच्या कामावर ५० लाख ८३ हजार तर सोनपेठ तालुक्यातील २४ विहिरींच्या कामावर आतापर्यंत २६ लाख ६४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश कामे मशीनच्या साह्याने झाली आहेत.