कोरोनाचे ८० ते ८२ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात बरे होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यावरुनच कोणत्या रुग्णांना आरोग्य संस्थेत दाखल करुन घ्यावे, त्याचे मार्गदर्शक नियम तयार करण्यात आले आहे. कमी लक्षणे असणारे, मध्यम लक्षणे असणारे आणि गंभीर लक्षणे असणारे रुग्ण असे तीन टप्प्यात कोरोना रुग्णांचे वर्गीकरण केले आहे. ज्या रुग्णांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ९० पेक्षा कमी आहे, अशाच रुग्णांना रुग्णालयांत दाखल करावे लागते. तसेच प्रत्येक रुग्णाचे सिटी स्कॅन स्कोअर काढण्याचीही आवश्यकता नाही. रुग्णाचा एक्स-रे काढूनही त्याच्या इन्फेक्शनची माहिती मिळू शकते. मात्र कोरोना झाल्यानंतर प्रत्येक जण स्वतःच सिटी स्कॅन करीत आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. सिटी स्कॅनच्या एका एचआरसीटी तपासणीतून ४०० एक्सरे रेडियशन्स रुग्णाच्या शरीरात जातात. त्यामुळे भविष्यात रुग्णाला कर्करोग होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे रेमडिसिविर इंजेक्शन, स्टेराॅईडचा अतिवापरही रुग्णासाठी घातक ठरु शकतो.
एक सिटीस्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे
एका वेळी सिटी स्कॅन करणे म्हणजे ८० ते १४० वेळा एक्स-रे काढण्यासारखे आहे. सिटी स्कॅनच्या किरणांमुळे शरीराच्या रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. यातून कर्करोग होण्याचा धोकाही संभवतो. त्याचप्रमाणे काही रुग्णांमध्ये नपुंसकताही येण्याची शक्यता असते.
बुरशीजन्य आजाराचा धोका
स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण होतो. त्यातून न्यूकॉरमायकोसिस म्हणजे नाकाला फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो. जो आयुष्यभरासाठी असतो. त्याचप्रमाणे मधुमेह, रक्तदाब, हाडाची ठिसूळता येणे आदी व्याधीही स्टेरॉईडच्या अति वापराने होऊ शकतात. त्यामुळे स्टेरॉईडचा वापर गरजेनुसारच होणे आवश्यक आहे.
दररोज २० सिटी स्कॅन :
जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० रुग्ण सिटी स्कॅन करतात. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढले आहे. सिटी स्कॅन करुन एचआरसीटी स्कोअर तपासून घेण्याचा प्रकार वाढला आहे. अनेक वेळा रुग्ण गरज नसताना भीतीपोटी सिटी स्कॅन करुन घेतात. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानेच सिटी स्कॅन करणे गरजेचे आहे.