बेडरूममध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By मारोती जुंबडे | Published: August 9, 2023 06:34 PM2023-08-09T18:34:33+5:302023-08-09T18:35:02+5:30
घटनेमागील कारण अस्पष्ट; दोन महिन्यात दूसरी घटना
पालम: एका दांपत्याच्या आत्महत्येला तिन महिनेही लोटले नसताना पुन्हा एकदा नाव्हलगावातच (ता.पालम, जि.परभणी) अशाच घटनेची पुनर्रावृत्ती झाली. त्यात पत्नीचा मृतदेह पलंगावर अढळून आला असून पतीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या मागील कारण समजू शकले नाही.
नाव्हलगाव येथील भरत नवनाथ शिंदे (२५) हे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी होते. ते पत्नी जया भरत शिंदे (२२) यांच्यासह कुटुंबापेक्षा वेगळे राहत होते. नेहमीप्रमाणे रात्री ते मंगळवारी दरवाजा लावून झोपी गेले. त्यांच्या घराचा दरवाजा बुधवारी सकाळी १० वाजले तरीही उघडला नव्हता. म्हणून शंका आल्याने नातेवाईकांनी खिडकीवर चढून आत डोकावून पाहिले. तेव्हा विदारक चित्र समोर दिसले. त्यात घरातील पलंगावर जया शिंदे ही मृतावस्थेत होती. तर बाजूला छताला दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत भरत शिंदे यांचा मृतदेह आढळून आला.
लागलीच घरातील मंडळींनी पालम पोलिस ठाण्यास घटनेची कल्पना दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दिपक टिपरसे, पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाढ, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणी करण्यासाठी सदर मृतदेह पालम ग्रामीण रूग्णालयात पाठवून दिले. घटनेमुळे नाव्हलगावात शोककळा पसरली आहे.
घटनेमागील कारण अस्पष्ट
नाव्हलगावातील या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नाही. पत्नी पलंगावर मृतावस्थेत आढळून आली. शिवाय, शेजारीच किटकनाशकाची बॉटल पडली होती. त्यामुळे तिचा मृत्यू विष पिल्याने झाला असावा, असे पोलिसांना वाटते. त्यानंतर पतीने आत्महत्या केली, हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तरीही दोघांनी सहमतीने जिवनयात्र संपविली का? घातपात आहे, हे पोलीस तपासानंतरच कळेल. तत्पूर्वी उत्तरीय तपासणीमध्ये मृत्यूचे कारण लक्षात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी यांनी दिली.
दोन महिन्यात दूसरी घटना
नाव्हलगावात २२ मे रोजी अशाची घटना घडली होती. तेव्हा सुधाकर रंगनाथ केडाळे व ज्योती सुधाकर केडाळे (रा.नाव्हा, ता.पालम), या दाम्पत्याने आत्महत्या करून जिवनयात्रा संपविली होती. तेव्हा सहा महिन्याचं तान्हं मुलं आणि अडीच वर्षांची चिमुकली हिला मागे ठेवून या दोघांनी विहीरीत उड्या घेतल्या होत्या. त्यापूर्वी येथे डझनभर लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त गाव म्हणून नाव्हलगावात जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम घेवून मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्याला दोनही महिने लोटत नाही, तोपर्यंत पुन्हा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.