जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत आघाडीत बिघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:43+5:302021-03-10T04:18:43+5:30
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत १० मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना ...
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत १० मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी असताना महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एका जागेवरून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांची मागणी लावून धरली आहे. समोरच्या उमेदवाराने अर्ज परत घ्यावा, यासाठी आग्रह धरला आहे. दोन्ही नेते आपल्या मागणीवर ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत एकसंघ वाटत असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन आरोप - प्रत्यारोप केले गेले, त्यांच्याच सोबतीने जिल्हा बॅंकेवर सत्ता मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू व त्यात यश मिळवू, असा ठाम विश्वास खासगी बैठकांमधून नेते मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दोन पॅनलच्या सरळ लढतीत किंतू-परंतुने निवडणुकीकडे पाहणाऱ्या विरोधी आघाडीतील उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, फारसे कष्ट न करता जिल्हा बॅंकेवर सत्ता मिळविण्याची स्वप्ने संबधितांना पडू लागली आहेत. बुधवार हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी दुपारी ३पर्यंत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्याचा दोन्ही जिल्ह्यातील राजकारणावर भविष्यात परिणाम दिसणार आहे.
देसाई यांच्या बिनविरोध निवडीने संकेत
प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्थांच्या पूर्णा गटातून मंगळवारी पांडुरंग लक्ष्मण डाखोरे व अरूण लक्ष्मणराव गुंडाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दुपारी २.५० व २.५५ वाजता परत घेतले. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक तथा भाजपचे नेते बालाजी देसाई हे बिनविरोध निवडले गेले आहेत. देसाई यांनी आ. सुरेश वरपूडकर यांच्या पॅनलकडून १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताना त्यांनी मतदारांसोबत शक्ती प्रदर्शनही केले होते. ९ मार्च रोजी त्यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर माजी आ. रापमप्रसाद बोर्डीकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम व अन्य नेत्यांची उपस्थिती होती. देसाई यांच्या बिनविरोध निवडीने आणि बोर्डीकर यांनी त्यांचा सत्कार केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.