जिल्ह्यात बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. सद्य:स्थितीत शेतीमध्ये कापसाची काढणी सुरू आहे. याच बरोबर शेतीतील पाण्यावर घेतलेल्या पिकांच्या मशागतीची कामेही वेगाने सुरू आहेत. जायकवाडी, येलदरी व निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी शेतीत याद्वारे पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकरिता शेतीत कामे करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असताना ते मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक मजूर तोडीच्या कामासाठी परगावी गेले आहेत, तर बरेच मजूर पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरांमध्ये कामाच्या शोधात गेले आहेत. त्यामुळे मजुरीच्या दरांमध्ये वाढ करूनही शेतकऱ्यांना मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना यंत्राचा सहारा घेऊन शेतीत कामे करावी लागत आहेत. यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
काय म्हणतात शेतकरी
मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊनदेखील मजूर मिळत नाहीत. त्यामुळे फवारणी, खुरपणी, खत घालणे, अशी मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. मजुरांअभावी स्वत:च्या कुटुंबातील सदस्यच कामावर येत आहेत.
-रमेश तांबे, शेतकरी देवगाव फाटा
गाव परिसरातील अनेक मजूर कामाच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये गेले आहेत. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे यंत्राच्या साहाय्याने कामे करून घ्यावी लागत आहेत. यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे.
-सोपान मोगल, शेतकरी, नागठाणा
खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे रबी हंगामावर आशा आहे. असे असताना मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. तरीही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे यंत्राद्वारे काम करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या कामासाठी यंत्रे घेतली आहेत. या माध्यमातून काम करताना शेतकऱ्यांचा एकीकडे वेळ वाचत असला तरी दुसरीकडे यासाठीचा खर्च अधिक लागत आहे. ट्रॅक्टरने नांगरणीसाठी एकरी १२०० रुपये, पाळीसाठी ६०० रुपये, सोयाबीन काढण्यासाठी ४ हजार रुपये द्यावे लागतात.