परस्पर शेतजमीन नावावर केली; मंडळ अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 04:21 PM2021-09-01T16:21:37+5:302021-09-01T16:23:49+5:30
Crime News Parabhani : तत्कालीन मंडळाधिकाऱ्यासोबत संगनमत करत जमीन बनावट दस्तावेज करून परस्पर नावावर करुन घेतली.
मानवत : तालुक्यातील पिंपळा शिवारातील गट क्रमांक 140 मधील दोन एकर शेत जमीन बनावट दस्तावेज तयार करून परस्पर नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी तत्कालीन मंडळाधिकाऱ्यासह दोघांवर मंगळवारी ( दि. 31 ) पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळा येथील रहिवासी महादेव नारायण सुरवसे यांचे आजोबा सिताराम निवृत्ती सुरवसे यांच्या मालकी व ताब्यात पिंपळा शिवारातील गट क्रमांक 140 मध्ये 2 हेक्टर 25 आर एवढी जमीन सन 1987 ते 2015 दरम्यानच्या सातबारा वर नमूद होती. आजोबा मयत झाल्यानंतर सदर गट नंबर मध्ये वारस पंडित सिताराम सुरवसे, गंगाधर सिताराम सुरवसे व महादेव यांचे वडील नारायण सुरवसे यांची नावे वारसाने यावयास हवी होती. परंतु, सीताराम सुरवसे यांचे वारस गंगाधर सुरवसे, नारायण सुरवसे हे अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन गावातील विठ्ठल लक्ष्मण सुरवसे आणि अनंता विठ्ठल सुरवसे यांनी तत्कालीन मंडळाधिकारी भरकडसोबत संगनमत करून गट क्रमांक 140 मधील जमीन बनावट दस्तावेज करून परस्पर नावावर करुन घेतली. या प्रकरणी महादेव नारायण सुरवसे यांच्या तक्रारी वरून विठ्ठल लक्ष्मण सुरवसे आणि अनंता विठ्ठल सुरवसे व तत्कालीन मंडळाधिकारी भरकड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.