पाथरी (जि.परभणी)- गृहकर्जाच्या थकीत वसुलीसाठी आलेल्या एका खाजगी फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत त्याच्याकडून जबरदस्तीने १० लाख रुपयांची थकीत रक्कम भरल्याची पावती बनवून घेतल्या प्रकरणी येथील भाजपाच्या शहर अध्यक्षांसह सहा जणांविरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
भाजपाचे पाथरी शहराध्यक्ष संतोष सावळीराम जोगदंड याने श्रीराम फायनान्स कंपनीकडून ५ ऑक्टोबर २०१५ रोजी ८ लाख २९ हजार ५१७ रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड झाली नसल्याने त्यांचे खाते एनपीएमध्ये गेले. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१७ रोजी थकीत रक्कम १४ लाख ९२ हजार ३८४ रुपये एवढी झाली. ही रक्कम वसूल करण्याची जबाबदारी फायनान्स कंपनीने मुंबईतील आसेंट रिकंन्स्ट्रक्शन या कंपनीला दिली. या कंपनीने १९ जुलै २०१७ रोजी कर्जदारास नोटीस पाठवून रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर थकीत रकमेच्या वसुलीसाठी १७ ऑक्टोबर २०२० रोजी सय्यद सोहेल सय्यद एकबाल हे कंपनीचे अधिकारी कर्जदार संतोष जोगदंड यांच्या घरी सायंकाळी ५.३०वाजता आले.यावेळी चौकशी अंती ज्या मिळकतीवर जोगदंड यांनी कर्ज घेतले होते. त्या पाथरी शहरातील साठे नगर भागातील जागेवर एक वृद्ध महिला राहत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर सय्यद सोहेल यांनी जोगदंड यांना फोन केला.
काही वेळानंतर जोगदंड तेथे अन्य पाच जणांसह आले व त्यांनी या अधिकाऱ्याचा मोबाईल हिसकावून घेत त्याला मारहाण केली. तसेच सोबतच्या प्रशांत नावाच्या व्यक्तीने बाजुच्या घरातील कुऱ्हाड व लोखंडी रॉड आणून त्याचा धाक दाखविला. त्यानंतर जोगदंड व इतरांनी सय्यद यांच्या गाडीची चावी हिसकावून घेत त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवून पाथरी-मानवत रस्त्यावरील एका ढाब्यावर नेले. तेथे त्यांच्या बॅगची तपासणी करून बॅगमधील कर्ज फेडीच्या पावती बुकावर १० लाख रुपयांचा भरणा केल्याची पावती लिहून दे अन्यथा गाडीसहजिवंत जाळून टाकू, अशी धमकी दिली. तशी पावती लिहून दिल्यानंतर त्यांना सोडून दिले. जाताना शहरात पुन्हा पाय ठेवला तर मारून टाकू, अशी धमकी दिली.सय्यद यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. त्यानंतर त्यांनी २२ ऑक्टोबर रोजी पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष जोगदंड, प्रकाश थोरात यांच्यासह सह जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री १२ वाजता पोलिसांनी जाेगदंड व थोरात या दोघांना अटक केली आहे.