परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बिज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार बियाणे विभागाच्या कार्यालयास ३१ मार्च रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागलेल्या आगीत फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले.
मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार विभागातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालय उघडले. त्यावेळी येथील वीजप्रवाह खंडित होता. अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने उच्च दाबाने वीजपुरवठा झाला आणि अचानक आगीचे लोळ उडाले. येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही माहिती अग्निशमन दलाला दिली. १० ते १५ मिनिटातच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.
आग विझवेपर्यंत या विभागाच्या सहयोगी संचालकांच्या कक्षातील खुर्च्या, टेबल, वातानुकूलित यंत्र जळून खाक झाले.सोमवारी रात्री जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्यापीठातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळी वीज पुरवठा पूर्ववत झाला तेंव्हा अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.