पूर्णा येथे शॉर्ट सर्किटने घराला आग लागून लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:53 PM2018-01-20T12:53:42+5:302018-01-20T12:55:19+5:30
शॉर्ट सर्किटने घराला आग लागून लाखो रूपयाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील भाटेगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली.
परभणी : शॉर्ट सर्किटने घराला आग लागून लाखो रूपयाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील भाटेगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली.
पूर्णा तालुक्यातील भाटेगाव येथे विश्वंभर नारायण क-हाळे यांच्या घरी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक विद्युत तारेमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. आगीने घराच्या पत्राखालील लाकडाने पेट घेतला. यानंतर आग वाढतच गेली. क-हाळे यांनी आग लागल्याचे लक्षात येताच ती विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. तसेच ग्रामस्थांनीही घटनास्थळाकडे धाव घेत आग विझविण्यास मदत केली. परंतु, तोपर्यंंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते.
गॅस सिलेंडर रिकामा असल्याने दुर्घटना टळली
आगीमुळे घरातील सर्वच वस्तुंनी पेट घेतला. यामध्ये पिठाची गिरणी, धान्य, संसारोपयोगी साहित्याही जळाले. यावेळी घरातील गॅस सिलेंडरनेही पेट घेतला. परंतु, दोन दिवसांपूर्वीच सिलेंडर संपल्याने मोठी हानी टळली.