परभणी स्थानकावरून धावली पहिली डेमू रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:52+5:302021-07-20T04:13:52+5:30
कोरोनाच्या संकटामुळे रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. त्यामुळे छोट्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ...
कोरोनाच्या संकटामुळे रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. त्यामुळे छोट्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. तेव्हा सवारी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांची मागणी होती. या मागणीची दखल घेत नवीन धोरणानुसार नांदेड विभागांतर्गत तीन डेमू रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात रोटेगाव-नांदेड, परळी-अकोट आणि पूर्णा-अकोला या रेल्वेचा समावेश आहे.
सोमवारी दुपारी रोटेगाव-नांदेड ही पहिली डेम्यू रेल्वे परभणी स्थानकावरून धावली. या रेल्वेचे परभणी स्थानकावर आगमन झाल्यानंतर मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेच्या चालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच रेल्वे स्टेशन मास्तर अरविंद इंगोले यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, खदिर लाला हाश्मी, श्रीकांत गडप्पा, वसंत लंगोटे, आदित्य लंगोटे, प्रशांत थानवी, माधुरी क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
डेमू रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
प्रवाशांना मिळणार लोकलचा फिल
मुंबई येथील लोकल रेल्वेच्या धरतीवर डेमू रेल्वेचे कोचेस तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास केल्याचा फिल मिळणार आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी या रेल्वेला प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र, ही रेल्वेसेवा सुरू केल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे डेमू रेल्वेला या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
तिकीट दर एक्स्प्रेसचेच
सवारी रेल्वेगाड्यांच्या धर्तीवर डेम्यू रेल्वे सुरू केली असली तरी या रेल्वे गाडीसाठी एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचेच तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वेगाड्याप्रमाणे या रेल्वे गाडीचे तिकीट दर कायम ठेवावेत, अशी मागणी होत आहे.