आधी बियाणांचा धोका, नंतर निसर्गाचा कोप; शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 01:55 PM2020-10-23T13:55:01+5:302020-10-23T13:59:01+5:30
सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव शिवारात पालकमंत्री नवाब मलिक यांनी पाहणी केली.
सेलू : अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची झालेल्या नुकसानीची सेलू तालुक्यातील वाकी आणि ढेंगळी पिंपळगाव शिवारात पाहणी करण्यासाठी शेतक-यांच्या बांधावर आलेल्या पालकमंञी नवाब मलिक यांच्या समोर व्यथा मांडून तातडीने मदतची मागणी केली. दोन दिवसात मंञी मंडळाच्या बैठकीत मदतीचा निर्णय घेऊन दिवाळी पूर्वी शेतक-यांना मदत करणार असल्याचे आश्वासन मलिक यांनी दिले.
शुक्रवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री नवाब मलिक यांनी वाकी शिवारातील प्रल्हाद हुंबे यांच्या ७ एकर शेतातील अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण शेतात पाणी साचले आहे. या शेताची पाहणी करून नवाब मलिक यांनी परभणी रस्त्यावरील ढेंगळी पिंपळगाव शिवारातील शिवाजी कोरडे, साहेबराव कोरडे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतक-यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पीक कर्ज मिळत नसून दलालामार्फत कर्ज मंजूर केली जात आहेत. शेकडो शेतक-यांची पीक कर्ज प्रस्ताव अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर उपविभागीय अधिकारी उमाकांत, तहसीलदार बालाजी शेवाळे, जिपचे सदस्य अशोक काकडे, पुरुषोत्तम पावडे, चंद्रकांत गाडेकर, मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
अन शेतक-याला रडू कोसळले
सोयबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. कापणीच्या वेळीच अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन भिजून कोंब फुटले, कापसाचा झाडा झाला. आता हाती काहीच उरले नाही. तसेच अमृत सोंळके सह चार शेतक-यांची दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात जमीन संपादित केली आहे. पंरतु अद्यापही वाढीव मोबदला मिळाला हे सांगताना शेतकरी सोंळके यांना रडू कोसळले.
वेळ प्रसंगी कर्ज काढून मदत करू
अतिवृष्टी व पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतक-यांना मदत करण्यासाठी कमी पडणार नाही. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीचा अद्यापही राज्याला परतावा मिळाला नाही. आपत्ती व्यवस्थापनातून केंद्रानेही राज्य सरकारला मदत करण्याची गरज आहे. शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढून दिवाळी पूर्वी मदत केली जाईल असे पालकमंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.