देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर करण्यात आली. त्यात एक हजार व पाचशे रुपयांच्या तत्कालीन नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर दोन हजार व पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. शिवाय नंतरच्या काळात शंभर, पन्नास, वीस, दहा, पाच रुपयांच्या नोटाही नव्याने चलनात आल्या. यातील ५०० व दोन हजाराच्या नोटांचे रंग उडत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
नोटा भिजल्यानंतर अधिक अडचण
चलनात दाखल झालेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा भिजल्यानंतर किंवा या नोटा घासल्यानंतर त्यांचा रंग उडून जात असल्याच्या तक्रारी आहेत.
वास्तविकत: चलन निर्मिती प्रक्रियेत सुरक्षा मानकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. बनावट चलन निर्मिती रोखण्यासाठी या मानकांचे महत्त्व असते. असे असताना या नवीन नोटांचा रंग पाणी लागल्यास लगेचच फिकट होत असल्याची तक्रार व्यावसायिकांकडूनही केली जात आहे.
बँकेकडे येऊ लागल्या नागरिकांच्या तक्रारी
दोन हजार, पाचशे रुपयांच्या नोटांचे रंग उडत असल्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात येऊ लागल्या आहेत. दहा रुपयांच्या नव्या नोटांबाबतही ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
तक्रार करणाऱ्या ग्राहकांची समजूत काढताना बँकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या नाकी नऊ येत आहेत.
राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांकडे या तक्रारी अधिक प्रमाणात येत असल्या तरी सर्वाधिक समस्यांना तोंड खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांना द्यावे लागत आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी सरळ हात वर करून ग्राहकांना परत पाठवत आहेत. यामुळे शाब्दिक बाचाबाची होत आहे.
पाण्यात पडल्यावर नोटांचा रंग जात आहे. तसेच जास्त दिवस घडी करून ठेवल्यावर घडी झालेल्या ठिकाणी नोटांचा रंग फिका पडत आहे. ५०० रुपयांच्या नोटांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.
-सचिन महेंद्रकर, व्यवस्थापक, गंगाखेड मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक