चौघे कुष्ठरोगाने तर सात जणांना क्षयरोगाने ग्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 06:23 PM2020-12-18T18:23:58+5:302020-12-18T18:26:46+5:30

१ ते १६ डिसेंबर या कालावधीत शहर व ग्रामीण भागात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली.

Four were infected with leprosy and seven with tuberculosis | चौघे कुष्ठरोगाने तर सात जणांना क्षयरोगाने ग्रासले

चौघे कुष्ठरोगाने तर सात जणांना क्षयरोगाने ग्रासले

Next
ठळक मुद्दे१ लाख २४ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण

देवगावफाटा : आरोग्य व क्षयरोग विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग व क्षयरोग मोहिमेत १ लाख २४ हजार ७३२ नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या तपासणीत तालुक्यातील ४ जणांना कुष्ठरोग तर सात जणांना क्षयरोग आजाराने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हबरडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांच्या नियंत्रणात १ ते १६ डिसेंबर या कालावधीत शहर व ग्रामीण भागात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत या मोहिमेंतर्गत सेलू शहरातील १२ हजार ७३२, वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५३ गावांतील ५९ हजार ४८७ तर देऊळगाव गात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४२ गावांतील ५२ हजार ८३६ असे एकूण १ लाख २४ हजार ७३२ नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करण्यात आली.

या तपासणी मोहिमेत अंगावरील चट्टे, हातपायाला मुंग्या येणे, स्नायूमध्ये अशक्तपणा, भुवयांवरील केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात, तळपायाला बधिरता येणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे असलेले संशयित रुग्ण ५८० आढळून आले. तर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्त जाणे, मानेवर गाठ येणे अशी लक्षणे असणारे १२८ संशयित क्षयरोग रुग्ण आढळून आले. या संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ४ कुष्ठरोग व सात क्षयरोग असल्याचे आढळून आले. या रुग्णांवर औषधोपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

या भागात आढळले रुग्ण
आरोग्य विभाग व क्षयरोग विभागाच्या वतीने सेलू शहरासाठी १६, वालूर प्राथमिक केंद्रांतर्गत १३४ व देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १२० कर्मचाऱ्यांची क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी १ ते १६ डिसेंबर या कालावधीत १ लाख २४ हजार ७३२ रुग्णांची तपासणी केली. यामध्ये सेलू शहरात कुष्ठरोग व क्षयरोग असलेले ३ रुग्ण सापडले. वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोग असलेला १ व देऊळगाव गात प्राथिमक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोग असलेले २, क्षयरोग असलेले ४ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Four were infected with leprosy and seven with tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.