गंगाखेड- परभणी रोडवर तरुण शेतकऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 06:39 PM2020-11-07T18:39:11+5:302020-11-07T18:40:15+5:30
गंगाखेड-परभणी रस्त्यावर महातपुरी फाट्यावर अपघात
गंगाखेड: भरधाव वेगात परभणीकडे जाणाऱ्या दहा चाकी ट्रकने दुचाकीवरील तरुण शेतकऱ्यास चिरडल्याची घटना शनिवारी (दि. ७ ) दुपारी २:२० वाजेच्या सुमारास गंगाखेड-परभणी रस्त्यावर महातपुरी फाट्यावर घडली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल सोपानराव बडे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो गंगाखेड येथील रहिवासी होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल बडे हा तरुण शेतकरी दुपारच्या जेवणासाठी महातपुरी शिवारातील शेतातून दुचाकीवर घराकडे येत होता. याचवेळी गंगाखेड येथून परभणीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दहा चाकी ट्रकने (क्रमांक एमपी १३ डीए ०४५७) अनिलच्या दुचाकीला (क्रमांक एमएच २२ एसी ६८९०) जोरदार धडक दिली. भरधाव वेग असल्याने ट्रकने अनिलला दुचाकीसह जवळपास पन्नास फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यामुळे अनिलचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा होऊन समोरील चाक तुटून एका बाजूला पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलराव घोगरे, जमादार सुनील लोखंडे, अ. मुजीब, दत्तराव पडोळे, श्रीकृष्ण तंबूड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रावण भालेराव यांच्या खाजगी रुग्ण वाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांचा लहान मुलगा, वृद्ध आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. महातपुरी फाट्याची हद्द सोनपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.