गंगाखेड: जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी नदीला दि. २७ सप्टेंबर रोजी मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या बॅकवाॅटरचे पाणी खळी व सुनेगाव जवळील पुलावर आल्याने नऊ गावांचा संपर्क तुटला असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरी नदीकाठी असलेल्या गावांसह शहरातील तारू मोहल्ला व बरकत नगर येथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दि. २६ रोजी दुपारनंतर गोदावरी नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. रात्री नदीला आलेल्या पुराचे बॅक वाटर इंद्रायणी नदीच्या सुनेगाव जवळील पुलावर आल्याने या मार्गावरील सुनेगाव, सायळा, मुळी, धारखेड, नागठाणा या गावांचा संपर्क तुटला तर रविवार रोजी पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पुराचे बॅक वाटर खळी गावाजवळच्या सोंड ओढ्याच्या पुलावर आल्याने खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळसावंगी या चार गावांचा संपर्क तुटला.
गोदावरी नदी पात्रातुन दुपारच्या सुमारास १ लाख ११, ४१९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुराची पातळी ८.१० मीटर झाली होती. यामुळे नदी पात्रातील श्री नृसिंह मंदिर वगळता सर्व मंदिरे, रथ मार्ग तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अस्थी विसर्जन घाट पाण्याखाली गेले व स्मशान भूमीत पुराचे पाणी शिरल्याने गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनीही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.