परभणी : ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे राज्य सरकार हे असंवेदनशील असून, कोणत्याच समाज घटकाच्या सुरक्षेचे सरकारला देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप खा. प्रीतम मुंडे यांनी येथे केला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात गुरुवारी पत्रकर परिषद घेण्यात आली. यावेळी खा. प्रीतम मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ओबीसीचे हक्काचे आरक्षण काढून घेण्याचे पाप या सरकारने केले आहे. आज राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. उद्या शैक्षणिक आरक्षणावरही ही वेळ येऊ शकते. त्यामुळे संपूर्ण समाजाने या बाबीकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. राज्य सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनानंतरही राज्य सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर आणखी तीव्र आंदोलन केले जाणार आहे. ओबीसींच्या हक्कासाठी केले जाणारे आंदोलन कोणत्याही एका जाती- धर्माचे नसून ते सर्वसमावेश राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकर परिषदेस आ. मेघना बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विठ्ठलराव रबदडे, रमेशराव गोळेगावकर, प्रमोद वाकोडकर, प्रदीप तांदळे, बाळासाहेब जाधव, भागवत बाजगीर, भालचंद्र गोरे, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, एन.डी. देशमुख, बाळासाहेब राजूरकर आदींची उपस्थिती होती.