शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, देवेंद्र फडणवीसांसोबत पंकजांचा पाहणी दौरा
By महेश गलांडे | Published: October 21, 2020 11:54 AM2020-10-21T11:54:30+5:302020-10-21T11:55:02+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना झाले आहेत.
परभणी - राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांचा आज परभणी आणि हिंगोली दौरा असून फडणवीसांच्या या दौऱ्यात माजी ग्रामविकामंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. यावेळी, शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरश: माती झाली असून सरसकट मदतीची मागणी पंकजा यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना झाले आहेत. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसऱ्यादिवशी 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांना त्यांनी भेटी दिल्या. मात्र, पंकजा यांचा नियोजीत नांदेड दौरा असल्याने त्या बीडमध्ये फडणवीस यांच्या दौऱ्याला हजर राहू शकल्या नाहीत. आज, परभणी येथून त्यांनी फडणवीस यांच्यासोबत दौरा सुरू केला आहे. ''परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांची अक्षरशः माती झाली असून शेतकऱ्यांना सरसकट मदत करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.'', असे पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांचा आज उस्मानाबाद दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी (दि. २१) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. तसेच, प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहेत.