चारित्र्याच्या संशयावरून गरोदर पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 03:31 PM2020-12-19T15:31:22+5:302020-12-19T15:33:22+5:30
११ ऑगस्ट २०१८ रोजी पत्नी कांचन हिच्या डोक्यात दगड मारुन लक्ष्णम चांडाळ याने तिचा खून केला होता.
परभणी : चारित्र्यावर संशय घेऊन गरोदर असलेल्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९ डिसेंबर रोजी हा निकाल देण्यात आला.
पूर्णा तालुक्यातील लक्ष्मण काशीनाथ चांडाळ हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. त्यातूनच ११ ऑगस्ट २०१८ रोजी पत्नी कांचन हिच्या डोक्यात दगड मारुन लक्ष्णम चांडाळ याने तिचा खून केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी कांचन या गरोदर होत्या. या प्रकरणी कांचन यांचे मामा ज्ञानोबा काशीद यांच्या माहितीवरुन आरोपी लक्ष्मण चांडाळ याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश २ सी.एम. बागल यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण चालविण्यात आले. त्यात १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
या प्रकरणातील एकंदरीत पुराव्यांअधारे न्या.सी.एम. बागल यांनी आरोपी लक्ष्मण चांडाळ यास दोषी ठरवून कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १ हजार रुपये दंड, कलम ३१६ अन्वये ५ वर्षे कैद व ५०० रुपये दंड, कलम ३०९ अन्वये ६ महिने साधी कैद अशी शिुक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा प्रमुख सरकारी अभियोक्ता डी.यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियोक्ता बी.बी. घटे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. मनाळे व कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून हवालदार पोलीस राठोड यांनी काम पाहिले.