हृदयरोग, अलर्जी असली तर कोरोना लस घ्यायलाच हवी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:38+5:302021-03-10T04:18:38+5:30
गंभीर आजाराच्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात आली आहे. हृदयरोग, मधुमेह व इतर गंभीर आजाराच्या ...
गंभीर आजाराच्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात आली आहे. हृदयरोग, मधुमेह व इतर गंभीर आजाराच्या रुग्णांनी ही लस घ्यावी की नाही, असा संभ्रम न बाळगता लस घेतली पाहिजे. गंभीर आजार असल्याने नागरिकांची प्रतिकार क्षमता कमी झालेली असते. लस घेतल्यानंतर ही प्रतिकार क्षमता वाढवून कोरोनापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे आजार असला तरी लस घेण्याचे टाळू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. विशेष म्हणजे शासनाने ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी लसीकणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर या रुग्णांचा कोरोनापासूच बचाव होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे गंभीर असलेल्या नागरिकांनीही लसीकरण करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हृदयरोग रुग्णांनीही ही लस घेतली पाहिजे. ज्यांची केवळ बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच ज्या रुग्णांचे व्हॉल्व बदलले आहेत. तसेच लहानपणापासून हृदयाला छिद्र आहे, अशा रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही लस घ्यावी.
- डॉ. गोविंद रसाळ, हृदयरोगतज्ज्ञ
मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलीच पाहिजे. त्यामुळे प्रतिकार क्षमता वाढते. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ज्या रुग्णांना रक्त पातळ करण्याची औषधी सुरु आहेत. त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी.
- डॉ. रुपेश नगराळे, मधुमेहतज्ज्ञ
थंडी - ताप आला तरी घाबरू नये...
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एक टक्का नागरिकांमध्ये थंडी, ताप येण्याची लक्षणे दिसून येतात. या नागरिकांनीही घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर थंडी-ताप आल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधी घ्यावी. त्यामुळे लस घेतल्यानंतर थंडी ताप आल्यास रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येकालाच असे होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे.