परभणी : जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी ९१७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मागील दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. रविवारपासून नव्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. रविवारी ८२१ नवीन रुग्ण रुग्ण नोंद झाले होते, तर सोमवारी ९१७ रुग्णांची भर पडली आहे.
आरोग्य विभागाला ३ हजार २६१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २ हजार ७७२ अहवालांमध्ये ६९६ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टच्या ४८९ अहवालांमध्ये २२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही चिंतेचे आहे. ३ मे रोजी ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात २, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या ११ रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ हजार १७१ वर पोहोचली असून, त्यातील ३० हजार २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ९२८ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ८०१२ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३९, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २४५, अक्षदा मंगल कार्यालयात १५५, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये १८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार ५१७ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत.