सुरुवातीच्या काळात शहरी भागात वाढलेला कोरोना संसर्ग आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. ४ मेपर्यंत जिल्ह्यात ६ हजार ६८० रुग्ण होते. त्यापैकी ४ हजार १८४ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत, तर शहरी भागात २ हजार ४९६ रुग्ण असल्याची नोंद घेण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील सेलू आणि गंगाखेड वगळता कुठेही गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांवरही शहरातील रुग्णालयांमध्येच उपचार सुरू आहेत.
२६६ रुग्णांचा मृत्यू
ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही आता वाढली आहे. ४ मेपर्यंत ७५३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी २६६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत, तर ४८७ रुग्णही शहरी भागातील आहेत. परभणी तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ जिंतूर तालुक्यात ४०, गंगाखेड २४, मानवत १८, पूर्ण २७, पालम १६, सेलू १५ पाथरी ८ आणि सोनपेठ तालुक्याच्या ग्रामीण भागात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.