परभणी : येथील पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी जयंत मीना यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाने काढले आहेत.
येथील पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचा परभणीतील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. २ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची बदली झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय परभणी येथे रुजू झाले होते. दोन वर्षांच्या कार्यकाळात उपाध्याय यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. कडक शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती.
दरम्यान, गुरुवारी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी राज्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये जयंत मीना यांची नियुक्ती परभणी येथे पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. जयंत मीना हे यापूर्वी बारामती जिल्ह्यात कार्यरत होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या बदलीचे स्थळ जाहीर केले नसून उपाध्याय यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढले जातील, असेही या आदेशात म्हटले आहे.