परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे झाले असून, हा रस्ता आता ''जैसे थे'' झाल्याने रस्त्यावर केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याच्या कामाविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा परभणी शहराला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या परिसरातील दहा ते पंधरा गावांची दररोज रस्त्याने वाहतूक होते; मात्र मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने ग्रामस्थ त्रस्त होते. रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर रस्ता मंजूर झाला अन् रडत पडत कामही पूर्ण करण्यात आले; परंतु अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्यावर २५ ते ३० ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरणादरम्यानच ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या; परंतु अभियंत्याने इस्टिमेट प्रमाणेच काम होत असल्याची समजूत काढत हा रस्ता पूर्ण केला. सध्या मात्र रस्त्याची अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अभियंत्याच्या दुर्लक्षाचा परिणाम
अवघ्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्याचे कामाकडे दुर्लक्ष झाले. कंत्राटदाराकडून व्यवस्थित काम होत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी ग्रामस्थांची अभियंत्याने समजूत काढली; परंतु रस्ता पूर्ण झाल्यानंतर पडलेले खड्डे निकृष्ट कामाची साक्ष देत आहेत. या प्रकरणात अभियंता आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मुदतीनंतर झाले काम
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१७-१८मध्ये टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यासाठी ३.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्ता पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांची मुदत दिली होती. याचा अर्थ ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात मार्च २०२१ मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. निकृष्ट डांबर वापरत आवश्यक त्या ठिकाणी भर घातली नसल्याने ग्रामस्थांनी यापूर्वीच रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या.
पुलालादेखील तडे
या रस्त्यावर कार्ला ते कुंभारी दरम्यान पूल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून, आता या पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे पुलाच्या कामाविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.