परभणी येथे व्याख्यान :स्मार्टनेस पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे- संतोष कार्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:15 AM2018-01-20T00:15:33+5:302018-01-20T00:19:10+5:30
विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून अभ्यासाचे क्षेत्र निवडावे़ तसेच योग्य नियोजन केल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते़ यासाठी केवळ कठोर पद्धतीने अभ्यास करून चालणार नसून स्मार्टनेस पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे, तरच यशस्वी होता येते, असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक व्याख्याते संतोष कार्ले यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून अभ्यासाचे क्षेत्र निवडावे़ तसेच योग्य नियोजन केल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते़ यासाठी केवळ कठोर पद्धतीने अभ्यास करून चालणार नसून स्मार्टनेस पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे, तरच यशस्वी होता येते, असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक व्याख्याते संतोष कार्ले यांनी केले़
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात कार्ले बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.बाळासाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ए.एन. डहाळे, प्रा.एस.एम. कुलकर्णी, प्रा.डी.बी.पाटील, प्रा.पी.पी. शिंदे, प्रा.एस.एन. मुंडे, प्रा.प्रकाश शिंगे, प्रा.किनगे आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्ले यांनी विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली. कार्ले म्हणाले, केवळ वैद्यकीय व अभियांत्रिकी अशा दोनच शाखा करिअरसाठी नसून हजारो अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आपल्याला अभ्यासक्रमाची माहिती नसल्याने या संधीपासून वंचित राहतो. दहावीनंतर जवळपास २००, बारावी कला शाखेमध्ये ८४, वाणिज्य १५०, पदवीमध्ये ३५०, एमबीबीएसमध्ये १०९, पदविकामध्ये ९७, पत्रकारितेत १८, फोटोग्राफीमध्ये १७, कायदा अभ्यासक्रमामध्ये ४३ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय दहावी, बारावी पास, नापास विद्यार्थ्यांसाठीही आयटीआयमध्ये जवळपास ११२ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन आपल्याला करिअर निवडता येते, असे त्यांनी सांगितले़ या प्रसंगी जेईई, नीट परीक्षेसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
शिवाय देशभरातील विविध संस्था त्यामध्ये राबविले जाणारे अभ्यासक्रम, पात्रता व यासाठी लागणाºया परीक्षा याची माहितीही त्यांनी सांगितली. प्राचार्य जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी बारावीतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वर्षभरातील अनुभव सांगितले़ प्रा. एस.एन. मुंडे यांनी प्रास्ताविक केले.