पाथरी : परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पाथरी तालुक्यात तर उमरा ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आपसात भिडले होते. आज लागलेल्या निकालानंतर येथील चित्र स्पष्ट झाले असून मतदारांनी तीनही पक्षाला बहुमतापासून दूर ठेवले आहे.
तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. येथे राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात तिरंगी लढत झाली. शिवसेनेचे तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडीच एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपसात भिडत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे येथील निकालाकडे लक्ष लागले होते. तीनही पक्षाने ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी जोर लावला होता. मात्र, आज सकाळी लागलेल्या निकालात कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 3 आणि कॉंग्रेसला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीतील आपसात भिडलेल्या तीनही पक्षाच्या उमेदवारांना मत देत कोणत्याच पक्षाला नाराज केले नसल्याचे चित्र आहे.
येथेही होणार महाविकास आघाडी ?शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे राज्यातील सत्तेत महाविकास आघाडीखाली एकत्र आलेले आहेत. यानंतर शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री झाला. आता सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर येथेही गावाच्या विकासासाठी तीनही पक्ष एकत्र येणार का ? यावर ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे.