मानवत (परभणी ) : नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणूकीत सोमवारी (दि. १७ ) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजपने युती करुन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी सकाळी साडे आकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात भाजपा - सेना युती, राष्ट्रवादी कॉंग्रेस -कॉंग्रेस आघाडी आणि एक अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात राहिल्याने तिरंगी लढत होणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणूकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडुन पुजा खरात, भाजपकडुन प्रा एस एन पाटील, शिवसेनेकडुन पांडूरंग नितनवरे यांच्यासह अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांनी ६ जुन रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १३ जुन होती मात्र प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतल्याने न्यायालयात अपील करण्यात आली. यामुळे १३ जुन ऐवजी १७ जुन पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. आज सकाळी साडे आकरा वाजता शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे भाजपाचे प्रा एस एन पाटील कॉंग्रेसच्या पुजा खरात आणि अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मतविभाजनाचा फायदा कॉंग्रेस आघाडीला होऊन नये यासाठी सेनेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजप सोबत एकत्र निवडणूक लढविण्याच्या निर्णय घेतला. या हालचाली दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२३ जुन रोजी मतदाननगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी २३ जुन रोजी मतदान होणार असुन २२ जुन रोजी संध्याकाळी पाच वाजे पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. प्रचारासाठी उमेदवाराना केवळ चारच दिवस मिळाले आहेत.