परभणी : राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली.
चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा दौरा २०० जनावरांच्या मुळावर
राज्यपाल कोश्यारी शुक्रवारी सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास परभणीत दाखल झाले. नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत होणारी आढावा बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे येथील कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी संवाद साधला. या बैठकीला जिल्हाधिकाती कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका आणि आरोग्य आदी विभागाचे केवळ १३ अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मिळाली.
जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देवीदास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, आदींची उपस्थिती होती. यावेळी राज्यपालांनी कृषी, सिंचन, आरोग्य आदी विभागावर भर दिला. सायंकाळी ५.४५ वाजता बैठक संपली.