जिंतूर (जि. परभणी) : अनेक वर्षांनंतर शंभर टक्के भरलेले येलदरी धरण रिकामे करण्याचा डाव राजकीय दबावातून पाटबंधारे विभागाने आखला असून, गरज नसताना येलदरी धरणातील पाण्याचा सिद्धेश्वर धरणात विसर्ग केला जात आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यांत ६० दलघमी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे.
यावर्षी येलदरी व सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले. या धरणामुळे परभणी जिल्ह्यातील १६ हजार १४२ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २२ हजार ६५८ हेक्टर व नांदेड जिल्ह्यातील १९ हजार ९८८ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार होता; परंतु शेतकऱ्यांची मागणी नसतानाही २२ नोव्हेंबरपासून सिद्धेश्वर धरणातून कालव्यामार्फत पाटबंधारे विभागाने राजकीय दबावातून पाणी सोडणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी रबी पिकांसाठीही मिळणार नाही. सोडलेल्या पाण्यापैकी केवळ १० टक्के पाण्याचा सिंचनासाठी वापर करुन ९० टक्के पाणी वेगवेगळ्या चाऱ्यातून वाया जात आहे. या पाण्यावरील कोणत्याही चाऱ्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या भागातील शेतकऱ्यांनी शेतात मोठे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात पाणी भरुन ठेवले जात आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. बिराजदार यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता ‘नंतर बोलतो’, असे म्हणून त्यांनी फोन बद केला. त्यानंतर सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.
सिद्धेश्वर धरण रिकामे२५ नोव्हेंबर रोजी येलदरी व सिद्धेश्वर १०० टक्के भरले होते. याच कालावधीत नांदेडकडे जाणाऱ्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. २५ जानेवारी रोजी सिद्धेश्वर धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक राहिले होते. या प्रकल्पातील ७५ टक्के पाणी नांदेडला सोडण्यात आले. सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी २५ टक्के झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी येलदरी धरणातून वीज निर्मितीच्या नावाखाली दररोज ४ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे.
कारण नसताना घेतले पाणी२२ नोव्हेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातील ७० टक्के पाणी पहिल्याच पाणी पाळीत सोडून देण्यात आले. त्यानंतर येलदरीमधून मागील पंधरा दिवसांपासून ६० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात सोडण्यात आले आहे. एप्रिल, मेपर्यंत येलदरी धरणातील पाणी घ्यायचे आणि मे महिन्यात जायकवाडीचे पाणी घ्याचे, असा डाव नांदेडच्या नेतृत्वाने आखल्याची शंका शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी जिंतूर येथे सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या प्रश्नी १८ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांची भेट घेऊन नांदेडला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच २४ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांची भेट घेतली जाणार असून, त्यानंतर आंदोलन तीव्र केले जाईल.
शासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलली नाहीत तर जनआंदोलन समितीचे १ हजार कार्यकर्ते जलसमाधी घेतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामाला पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. यासाठी शासनाने तातडीने येलदरी- सिद्धेश्वर धरणातून जाणारे पाणी बंद करावे. - डॉ.दुर्गादास कानडकर, निमंत्रक, पाणी बचाव आंदोलन समिती, जिंतूर