परभणी : राष्ट्रगीत असताना 'वंदेमातरम्'ची सक्ती कशासाठी ? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे 'वंदेमातरम्'ला आमचाही विरोध आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यामुळे औवेसींच्या एमआयएमशी हातमिळवणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी औवेसींच्या सुरात सूर मिसळल्याचे दिसून येते.
मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या निमित्ताने अॅड.प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अॅड.आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आणि माझी एकवेळा भेट झाली. त्यावेळी काँग्रेससोबत युती करण्याबाबत चर्चा झाली. बोलणी करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचेही त्यांनी सांगितले. वंचित आघाडीने चार सदस्यांची समितीही स्थापन केली. मात्र काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने ही बोलणी पुढे सरकली नाही. काँग्रेससाठी आघाडीची दारे मोकळी आहेत; मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाठी आघाडीची दारे बंद असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
लोकसभेच्या सर्व जागा आघाडी लढविणारकुंभार, लोहार, नाव्ही, शिंपी यासारख्या ओबीसीतील लहान घटकांचा बहुजन वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेच्या सर्व जागा आघाडी लढविणार असून, या निवडणुकीत ओबीसीतील लहान घटकांतूनच सर्वाधिक उमेदवार दिले जाणार आहेत. बहुजन वंचित आघाडीने एम.आय.आय. पक्षाशी मैत्री केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही पक्षांनी अतिशय हिनपणे जातीचा उल्लेख केला. या हिडीस प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. ज्यावेळी जाती आणि धर्माच्या राजकारणाला आव्हान दिले जाते, त्यावेळी द्वेषाचे राजकारण होते, असे सांगून चारही मोठ्या पक्षांची ही वृत्ती वर्चस्ववादी मानसिकता असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
राष्ट्रगीत असताना वंदेमातरमची सक्ती का ?एम.आय.एम. पक्षाचा 'वंदेमातरम्'ला विरोध आहे, तुमची भूमिका काय? असा प्रश्न विचारला तेव्हा आंबेडकर म्हणाले, राष्ट्रगीत असताना वंदेमातरम् ची सक्ती कशासाठी ? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे वंदेमातरम् ला आमचाही विरोध आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.