शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:49 PM2020-11-04T18:49:32+5:302020-11-04T18:50:34+5:30
खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली.
जिंतूर : तालुक्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले असताना आता शेतातील पाण्याचा निचरा झाला नसल्याने रबी पेरण्यांमध्ये खोडा निर्माण झाला आहे. पेरण्या लांबून रबी हंगामातही नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. खरिपाची पिके बहरात होती. पिके ऐन काढणीला आली असतानाच तालुक्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली. मात्र पंधरा दिवसांपासून शेत जमिनीत साचलेले पाणी बाहेर पडले नाही. जमिनीचा वापसाही झाला नाही. अशा परिस्थितीत पेरण्या करायच्या कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या असला तरी उत्पन्न निघेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकंदर शेत जमिनीतील पाण्याचा वापसा झाला नसल्याने पेरण्या लांबणीवर पडत आहेत. सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या या तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्याने हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या शेतात ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे. पाणी साचलेले असल्याने एक महिना वापसा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रबी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
बियाणांची जुळवाजुळव
शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे येत आहेत. सुरुवातीला सोयाबीनचे बोगस बियाणे, त्यानंतर अतिवृष्टी, कापसावर पडलेला रोग या संकटामुळे उत्पादनात घट झाली आहे. आता रबी पेरण्यांचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खतांसाठी पैशाची जुळवा जुळव केली आहे. मागील हंगामातील नुकसान लक्षात घेता बियाणांचा मोफत पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
१ टक्का क्षेत्रावर पेरणी
तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी ७५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. रबी हंगामासाठी ४५ हजार हेक्टर क्षेत्र राखीव आहे. रबी हंगामात केवळ एक टक्का क्षेत्रावर आतापर्यत पेरणी झाली आहे. नदी काठावरील ५० ते ६० गावांमध्ये वाफसा झाला नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत.