दीड पटीने वाढविला शिवभोजन लाभार्थ्यांच्या इष्टांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:21+5:302021-06-30T04:12:21+5:30
ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीला एकूण १४ केंद्रांवरून ...
ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीला एकूण १४ केंद्रांवरून लाभार्थ्यांना मोफत भोजन दिले जात आहे. या प्रत्येक केंद्राला लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले जाते. १५ जून ते १४ जुलैपर्यंत लाभार्थ्यांना निशुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेत पूर्वीच्या इष्टांकात दीडपट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रांना सद्यस्थितीत असलेल्या प्रतिदिनी लाभार्थ्यांची संख्या दीडपटीने वाढविली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार परभणी शहरातील काही शिवभोजन केंद्रांना २७५ लाभार्थ्यांचा इष्टांक होता. तो आता १५ जून ते १४ जुलै या कालावधीसाठी ४१३ लाभार्थी करण्यात आला आहे. तसेच ज्या शिवभोजन केंद्रांचा इष्टांक १०० लाभार्थी होता, त्यांना दीडशे लाभार्थ्यांपर्यंत इष्टांक वाढविला आहे. दीडशे लाभार्थी असलेल्या केंद्रांना २२५, ७५ लाभार्थी असलेल्या केंद्रांना ११२ लाभार्थ्यांचा इष्टांक दिला आहे. जिल्ह्यातील १४ शिवभोजन केंद्रांना आतापर्यंत प्रति दिन १८०० लाभार्थ्यांचा इष्टांक होता. त्यात दीडपटीने वाढ करण्यात आली असून, आता दररोज २ हजार ७०० लाभार्थ्यांना मोफत शिवभोजन दिले जाणार आहे. १४ जुलैपर्यंत ही योजना राबविली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.