जमिनीच्या जुन्या वादातून शेतकऱ्याचा खून करून आरोपी ठाण्यात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:17 PM2020-02-26T14:17:00+5:302020-02-26T14:17:29+5:30
आरोपीने स्वत:हून ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पूर्णा (जि. परभणी) : शेतीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्याचा तीक्ष्ण हत्याराचे वार करून खून केल्याची घटना पूर्णा शहराजवळ असलेल्या कानडखेड शिवारात सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपीने स्वत:हून ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
तालुक्यातील कान्हेगाव येथील रहिवासी असलेले लक्ष्मण माणिकराव नवघरे (३२) आणि अनंता दत्तराव नवघरे (२८) या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद होता. मंगळवारी रात्री दोघेही गाडीवर बसून पूर्णा शहर परिसरात असलेल्या कानडखेड शिवारात आले. या ठिकाणी शेतीच्या वादातूनच दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अनंता नवघरे याने लक्ष्मण नवघरे याच्या शरीरावर खंजिराने जोरदार वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण नवघरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनंता नवघरे याने रात्रीच पूर्णा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोनि. गोवर्धन भुमे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी मृतदेहाच्या बाजूस दारूच्या रिकाम्या बाटल्याही पोलिसांना आढळल्या आहेत. या प्रकरणी मंगळवारी खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे. पोनि. गोवर्धन भुमे तपास करीत आहेत.